मागच्या भागात आपण बघितलं, प्रोग्राममधे (program) गणिती क्रिया करताना "=" या चिन्हाचा अर्थ समीकरणाप्रमाणे डावी बाजू व उजवी बाजू समान आहेत हे दर्शवायला होत नाही. आकडेमोड होते "=" च्या उजवीकडे. नि आलेलं उत्तर "=" च्या अलीकडच्या व्हेरिएबलमधे साठवून ठेवलं जातं. आज आपण "="चा उपयोग समीकरणाप्रमाणे डाव्या व उजव्या बाजूंची समानता दाखविण्यासाठी कधी व कसा केला जातो ते बघणार आहोत.
प्रोग्रामला वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळं काम करायला सांगण्यासाठी, दिलेल्या अटींनुसार चालणाऱ्या कमांड्स (commands) वापरल्या जातात. या कमांड्समधे जेव्हा "=" हे चिन्हं वापरलं जातं तेव्हा त्याचा वापर डावी बाजू व उजवी बाजू समान आहेत का हे दर्शविण्यासाठी केला जातो. काही प्रोग्रामिंगमधे लॅंग्वेजेसमधे (programming languages) त्यासाठी "==" असं चिन्हं वापरतात.
अटींनुसार चालणाऱ्या कमांड्समधील सर्वात सोप्पी कमांड आता आपण बघू या. सोबतचं उदाहरण, युजरने (user) दिलेले दोन आकडे समान आहेत का हे तपासून बघेल.
Example : if - else
Program in Blockly

Program in JavaScript

आता तुम्ही म्हणाल, आम्हीच ते आकडे इनपुट (input) करणार तर आम्हाला माहित असेलच की ते सारखे आहेत की नाहीत. यासाठी प्रोग्राम कशाला लिहायला पाहिजे! या सदरामधे आपण कमांड्स शिकण्यासाठी छोटी छोटी उदाहरण घेतो आहोत, त्यामुळे या उदाहरणांचा काय उपयोग असं तुम्हाला वाटू शकतं. पण एक लक्षात घ्या, मोठे मोठे प्रोग्राम्सपण अशाच छोट्या छोट्या कमांड्स वापरून बनतात.
समजा, आपल्या कम्प्युटरमधील क्रिकेटच्या गेमच्या प्रोग्राममधे, TotalOvers आणि OversBowled अशी दोन व्हेरिएबल्स (variables) आहेत. तर, त्या प्रोग्राममधे कुठेतरी if (OversBowled == TotalOvers) ही कमांड असेल की नाही?!