सगळ्यात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा! आता मला सांगा या नवीन वर्षासाठी तुम्ही काही संकल्प केला आहे का? मी केला आहे. माझा संकल्प आहे बालमैफलमधील या सदराच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना कंप्युटर प्रोग्रामिंगची, म्हणजेच कोडिंगची, तोंडओळख करून द्यायची!
तुमच्यापैकी किती जणांनी कंप्युटर वापरला आहे? स्वतःचा, आई-बाबाचा, दादा-ताईचा किंवा शाळेतला? बहुतेकांनी वापरला असेल. तुम्ही जरा स्वतःशीच आठवून बघा की तुम्ही कंप्युटर पहिल्यांदा कधी बघितलात? पहिलीत असताना किंवा त्याच्याही आधी, हो की नाही? (मी तर नववीपर्यंत बघितला नव्हता!)
आणि तुम्ही कंप्युटर वापरून काय काय केलं सांगा पाहू? गेम्स् खेळतात, मीडिआ प्लेअर वापरून तुमच्या आवडत्या कार्टून्सच्या डी.व्ही.डी. बघितल्यात, विंडोज् मधलं पेंट वापरून चित्र काढलीत (रंग बाहेर जायची काळजीच नको), मायक्रोसॉफ्ट वर्डमधे स्वतःचं नाव वेगवेगळ्या फॉण्ट्स मधे लिहून बघितलं, वगैरे, वगैरे. शाळेत पण तुम्हाला कंप्युटर हा विषय असतो.
आपण गेम्स्, मीडिआ प्लेअर, पेंट, वर्ड, यांचा उल्लेख केला ना, ही सगळी कंप्युटर सॉफ्टवेअर्स आहेत. ही आणि अशी सॉफ्टवेअर्स तुम्ही पाहिली असतील. पण कंप्युटर प्रोग्रामिंग म्हणजे काय हे कोणाकोणाला माहित आहे? तुमच्यापैकी कधी कोणी एखादा कंप्युटर प्रोग्राम लिहून बघितलाय का? किंवा कोणाला कंप्युटर प्रोग्रामिंग करताना बघितलंय का? माझी खात्री आहे, जरी तुमच्यापैकी बहूतेकांनी कंप्युटर वापरला असला तरी खूपच कमी जणांना कंप्युटर प्रोग्रामिंग विषयी माहिती असेल.
पहिल्याच भागात जास्तं माहिती देत बसत नाही, कारण तुम्हाला आज एखादा तरी प्रोग्राम लिहायची उत्सुकता असेल. प्रोग्रामिंगचं माझं सर्वात आवडतं पुस्तक म्हणजे "The C Programming Language" by Kernighan and Ritchie. ते आता तसं जूनं झालं असल्याने आणि तुमच्यासाठी कठिण असल्याने, ते वाचा म्हणून सांगणार नाही. पण त्यातल्या पहिल्या प्रोग्रामवर आधारीत प्रोग्राम लिहून आपण प्रोग्रामिंग शिकण्याची सुरूवात करूया. हा प्रोग्राम आपल्याला "Hello, World!" हे वाक्य लिहून दाखवेल.
Example "Hello, World!"
Program in Blockly

Program in JavaScript

Program Output

"छ्या! काय तर म्हणे, 'Hello, World'!! हा काय प्रोग्राम झाला का?!", असंच वाटलं ना तुम्हाला? ही तर सुरूवात आहे. या उदाहरणात आपण प्रिंट कमांड शिकलो. तुम्ही एखादा गेम सुरू करता तेव्हा सर्वात आधी जो स्क्रीन दिसतो, त्यात गेमचं नाव, तो बनवणाऱ्या कंपनीचं नाव, वगैरे, लिहिलेलं असतं. ते या अशा प्रकारच्या प्रिंट कमांड्स वापरूनंच तर लिहिलं जातं!
या उदाहरणात ब्लॉकली (Blockly) मधे “print” लिहिलं आहे, जावास्क्रिप्ट (JavaScript) मधे “widnow.alert” लिहिलं आहे. मग आपण नक्की कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज शिकणार आहोत? ब्लॉकली की जावास्क्रिप्ट? या प्रश्नाचं उत्तर सदराच्या पुढच्या भागांमधून मिळेलंच!!