सदराच्या ह्या भागाचं शीर्षक बघून वैतागलात ना? "हे काय, आज पुन्हा प्रिंट हॅलो? ते तर आपण पहिल्याच भागात शिकलो ना?", असाच विचार करताय ना? पण जरा थांबा. त्या भागात आपण सरसकट सगळ्या जगाला हॅलो म्हटलं होतं. आज आपण एका ठराविक व्यक्तिला, म्हणजे आपला प्रोग्राम वापरणाऱ्या व्यक्तिला, म्हणजेच युजर (user) ला, त्याच्या नावाने हॅलो म्हणणार आहोत.
आता मला सांगा, मला जर तुम्हाला हॅलो म्हणायचं असेल, तर काय करावं लागेल? मला आधी तुमचं नाव विचारायला हवं, तुम्ही नाव सांगितल्यावर ते लक्षात ठेवायला हवं, नि तुम्हाला हॅलो म्हणताना, त्या वाक्यात ते नाव वापरायला हवं. आजचा आपला प्रोग्राम हेच करणार आहे.
Example "Hello, <तुमचं नाव>!"
Program in Blockly

Program in JavaScript

Program Output



पहिली कमांड (command) :
Prompt for text with message "What is your name?"
"तुझं नाव काय आहे?" असा प्रश्न विचारून, प्रोग्रामच्या युजरला काही मजकूर टाईप करायला सांगा.
दुसरी कमांड :
Set x to <output of command 1>
"तुझं नाव काय आहे?" असा प्रश्न विचारून, प्रोग्रामच्या युजरला काही मजकूर टाईप करायला सांगा.
तिसरी कमांड :
Create text with "Hello, ", x, "!"
"Hello, " या मजकूराला, x या व्हेरिएबलमधे साठवून ठेवलेला मजकूर जोडा, त्यापुढे "!" जोडा
चौथी कमांड :
Print <output of command 3>
तिसऱ्या कमांडने जोडलेला मजकूर प्रिंट करा.
Hello हा शब्द आपण अवतरण चिन्हात लिहीला आहे, पण x हा शब्द अवतरण चिन्हात लिहीला नाही आहे. यातील फरक लक्षात घ्या. x हा शब्दसुद्धा जर आपण अवतरण चिन्हात लिहीला असता, तर "Hello, x!" असं प्रिंट झालं असतं. कारण अवतरण चिन्हातला मजकूर जसाचा तसा घेतला जातो. अवतरण चिन्ह न वापरता लिहीलेला मजकूर, एक तर तो प्रोग्रामिंग लँग्वेजची एखादी कमांड असतो, किंवा व्हेरिएबलचं नाव.
आपल्या आजच्या उदाहरणात x हे व्हेरिएबलचं नाव आहे. पहिल्या कमांडमधे युजरने टाईप केलेलं नाव (समजा, Aparna), हे दुसऱ्या कमांडनुसार x या नावाच्या व्हेरिएबलमधे साठवून ठेवलं जाईल, व ते तिसऱ्या कमांडमधे "Hello, " या मजकूराच्या पुढे जोडून, व त्यापुढे "!" जोडून ,"Hello, Aparna!" असं प्रिंट केलं जाईल.
आता, हे व्हेरिएबल ही काय भानगड आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण ते पुढच्या भागात!