मागील भागात आपण व्हेरिएबलच्या वापराचा तिसरा टप्पा शिकलो, व्हेरिएबलमधे साठवून ठेवलेली किंमत प्रोग्राममधे वापरायचा. आपण जेव्हा व्हेरिएबल "=" च्या अलिकडे न वापरता, इतर ठिकाणी वापरतो, तेव्हा आपण त्या व्हेरिएबलमधे साठवलेली किंमत वापरत असतो.
मागील भागात आपण जे उदाहरण बघितलं, त्यात आधी आपण “a” व “b” या व्हेरिएबल्समधे ठराविक किंमती साठवून ठेवल्या आणि “c” या व्हेरिएबलच्या मदतीने, त्यांच्या किंमतींची अदलाबदल केली.
Example : Exchange Values Stored in Two Variables
Program in Blockly

Program in JavaScript

तुमच्या लक्षात आलं का की या उदाहरणात कमांड्सखेरीज काही वाक्यं लिहिलेली होती. ती वाक्यं प्रोग्राममधे असली तरी ती प्रोग्रामिंग लँग्वेजमधे लिहिलेली वाटत नाहीत. ती वाक्यं आपल्या नेहेमीच्या इंग्रजी भाषेतलीच वाटतात. ही वाक्यं म्हणजे कमेंट्स (comments) आहेत. आता तुम्ही विचाराल, कंप्युटरला इंग्रजी कळतं का? तर, नाही. मग त्याला ही वाक्यं कशी कळणार? नाहीच कळत त्याला ती. प्रोग्राम रन करताना कंप्युटर चक्कं ह्या वाक्यांकडे दुर्लक्ष करून पुढे जातो.
प्रोग्रामच्या आउटपुटसाठी या कमेंट्सची काहीच गरज नसते. वरील उदाहरणातील कमेंट्स वगळून जरी हा प्रोग्राम रन केलात, तरी प्रोग्रामच्या आउटपुटमधे काही फरक पडणार नाही. मग आपण उगीच या कमेंट्स का लिहायच्या? प्रोग्राममधील वेगवेगळे भाग नक्की काय काम करतात हे आपल्याच समजायला सोप्पं जावं म्हणून या कमेंट्स वापरल्या जातात. आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेजपेक्षा इंग्रजी सरावाची असल्याने आपण या कमेंट्स पटकन वाचू शकतो. ह्या उदाहरणात मी लिहिलेल्या कमेंट्समूळे तुम्हाला हा प्रोग्राम समजायला सोप्पा वाटला की नाही?
सध्या छोटे छोटे प्रोग्राम लिहिताना तुम्हाला कमेंट्सची गरज वाटणार नाही. पण प्रोग्राम लिहिताना मधे मधे अशा कमेंट्स लिहायची सवय लावून घेतलीत तर पुढे मोठे प्रोग्राम लिहिताना त्याचा खूप फायदा होईल.