व्हेरिएबलच्या वापराचे तीन टप्पे आपण आत्तापर्यंत शिकलो. या पुढचा नि शेवटचा टप्पा आहे, व्हेरिएबलची व्याप्ती, म्हणजे, स्कोप ऑफ दी व्हेरिएबल (Scope of the Variable). पुस्तकात जसे धडे असतात, तसे मोठ्या प्रोग्रामचे (program) छोटे छोटे भाग केलेले असतात. त्यातल्या एखाद्या भागात आपण एखादं व्हेरिएबल डिक्लेअर (declare) केलं तर ते आपण त्या प्रोग्रामच्या इतर कोणत्याही भागात वापरू शकतो का? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आत्ता जाणून घेता येणार नाही. कारण अजून आपण प्रोग्रामचे वेगवेगळे भाग काय असतात हेच शिकलो नाही आहोत. त्यामुळे हा प्रश्न तुर्तास पुढे ढकलू या.
हे सदर सुरू झाल्यापासून आजपर्यंतचे बरेचसे भाग आपण व्हेरिएबल्सविषयीच माहिती घेत होतो. एवढं काय या व्हेरिएबल्सचं महत्त्व, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कंप्युटर गेमचं उदाहरण घेऊन आपण या प्रश्नाचं उत्तर शोधू या.
तुमच्यापैकी कोणी कोणी कंप्युटरवर किंवा मोबाईल फोनवर एखादा गेम खेळला आहे? काही जण रोज गेम्स खेळत असतील. काहींनी कधीतरी एखादा गेम खेळून बघितला असेल. नि ज्यांनी कधीच खेळला नसेल, त्यांनी प्रत्यक्ष मैदानावरचे खेळ तर खेळले असतीलंच. बहूतेक गेम्समधे वेगवेगळ्या लेव्हल्स (levels) असतात. तुम्ही गेम खेळायला सुरूवात करता तेव्हा तुम्ही पहिल्या लेव्हलला असता. मग एकेक लेव्हल्स पार करत तुम्ही पुढच्या लेव्हलला जाता नि तुम्हाला काही पॉइंट्स (points) मिळत जातात.
आता मला सांगा, मैदानावर क्रिकेट खेळताना, ही पहिली इनिंग्ज (innings) आहे का दुसरी, किती रन्स झाल्या, किती ओव्हर्स झाल्या, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवता. क्रिडांगणावर मॅच चालू असेल तर यासाठी स्कोअरबोर्ड असतो. कंप्युटरवर क्रिकेट खेळताना हे आकडे कोण लक्षात ठेवणार? काय, येतंय का काही लक्षात? बरोबर ओळखलंत, हे काम व्हेरिएबल्स करणार! कंप्युटरवरच्या क्रिकेटच्या गेमचा जो काही प्रोग्राम असेल, त्यातली काही व्हेरिएबल्स CurrentInnings, OversBowled, TotalRuns, WicketsFallen, ही अशी असतील. हो की नाही?
गेम सुरू करताना या व्हेरिएबल्सच्या किंमती काय असतील बरं?
Example : Initializing Variables
Program in Blockly

Program in JavaScript

जसजसा गेम पुढे सरकेल तशा या किंमती बदलत जातील. त्यासाठी आपल्याला प्रोग्रामिंग लॅंग्वेजमधे मूलभूत गणिती क्रिया कशा वापरल्या जातात ते शिकायला हवं. पण ते पाहूया पुढच्या भागात.